Founder

EnglishMarathi

श्री रोहिदास शंकर पाटील

संस्थापक - अध्यक्ष

१९९४ साली पेरलेल्या बीजाच्या अंकुराचे पालनपोषण करून त्याचे कोंबात रुपांतर होऊन त्याचे फलरूप मिळण्यासाठी आपण अथक परिश्रम केले.

उच्च शिक्षणासाठी समर्पित आपली शंकर नारायण एज्युकेशन ट्रस्ट व संलग्नीत महाविद्यालयाने गेल्या दीड तपात अनेक मैलाचे दगड पार केले. बाल्य अवस्था संपून प्रौढ अवस्थेत स्थित्यंतर झाल्याचे कळलेच नाही. तथापि कार्याचा मागोवा घेताना शैक्षणिक, सांस्कृतिक, कला व क्रीडा क्षेत्रात घेतलेली उत्तुंग भरारी मन रिझवणारी आहे. शैक्षणिक गुणवत्ता व दर्जा टिकवण्याचा आणि जोपासण्याचा केलेला प्रयत्न संतृप्त करतो. परिसरात किंबहुना विद्यापीठात या महाविद्यालयाची विशेष प्रतिमा निर्माण झाली आहे. त्यामुळे ज्ञानाची व प्रतिभेची ज्योत निरंतर तेवत ठेवण्यासाठी जबाबदारी वाढली आहे. भव्यदिव्य इमारत, शिक्षणास पोषक व निसर्गरम्य वातावरण आणि अतिअद्यावत सोईनिशी संगणक कक्ष आणि ग्रंथालय समृध्द करून नवीन शैक्षणिक आव्हान पेलण्यास संस्था समर्थ व कटिबद्ध आहे.

जागतिकीकरण, खुली अर्थव्यवस्था, विज्ञान व तंत्रज्ञान युगाची अदभूत किमया त्याला साजेशी शैक्षणिक उत्क्रांती व संक्रमण याच नित्य सृजन प्रवाहित आहे. स्थित्यंतर व बदल हा निसर्गाचा मुलभूत व स्वाभाविक नियम आहे. तो जीवनातील सर्वच उपक्रमांना अपरिहार्य व अटळ आहे. शैक्षणिक उपक्रम व व्यवस्थापनही त्याला अपवाद असू शकत नाही. हा सृष्टीचा नियम आपण ही अंगिकारला आहे. नवचैतन्याची साद निसर्ग देत असतो. नवोन्मेषाचे धुमारे व सृजन ही तर्कसंगत धारणा व धोरण आपण निश्चित केले आहे. पारंपारिक शिक्षणक्रमाला छेद न देता नवीन व्यवसायभिमुख अभ्यासक्रम, व्यवस्थापन शिक्षण व तंत्रज्ञान अभ्यासक्रम सुरु करून शैक्षणिक उपक्रमाच्या कक्षा रुंदावल्या आहेत. प्रचलित असलेल्या अतिअद्ययावत सोईसुविधा देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. या महाविद्यालयाचा विद्यार्थी राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत टिकण्यासाठी त्यांना हव ते ज्ञान व साधन देण्याचा आपला प्रयास आहे. सामाजिक बांधिलकी व ऋण हे तत्व आपण जोपासत आहोत. शैक्षणिक दर्जा व गुणवत्ता टिकवण्यासाठी कोणत्याही तत्वाशी अथवा नीतीमुल्याशी आपण तडजोड करणार नाही हे संस्थेचे अभिवचन आहे. विशिष्ट ध्येयाने व उद्दिष्टाने प्रेरीत होऊन या महाविद्यालयाची निर्मिती आपण केली आहे. संस्थेची प्रतिमा मलीन होणार नाही अशी आपण सर्वांनीच काळजी घ्यावयाची आहे. समाजातील लोकांनी दाखविलेल्या विश्वासास आपण पात्र ठरलो असून त्यांच्या विश्वासास तडा जाऊ देणार नाही अशी आपण प्रतिज्ञा करूया.

महाविद्यालयाच्या प्रगतीमध्ये व्यवस्थापनाबरोबर सर्वच घटकांचे व कर्मचाऱ्यांचे अमूल्य योगदान आहे. संस्थेविषयी असलेली आत्मीयता, जिव्हाळा आणि आस्था दिवसेंदिवस वृद्धिंगत होत राहो. संस्थापक अध्यक्ष म्हणून उत्तरदायित्व माझ्यावर असले तरी जगन्नाथाचा रथ पुढे नेण्याचे सामर्थ्य ईश्वर देत असतो. आपण निमित्त मात्र असतो.

संत तुकाराम महाराजांच्या उक्ती प्रमाणे -

फोडिले भांडार माल तो धन्याचा |

मी तो हमाल भार वाही ||

कर्तृत्व व दातृत्व त्या ईश्वराला समर्पित करून संस्थेचे कार्य सुरळीत चालण्यासाठी तो आपणास शक्ती प्रदान करो.

आपला,

श्री रोहिदास शंकर पाटील

(संस्थापक - अध्यक्ष)

श्री शंकर नारायण एज्युकेशन ट्रस्ट

Late Shree Pravin R. Patil

(24.8.1965 to 26.5.1998)

Founder Trustee

Our great source of inspiration and aspiration. His vital contribution and selfless service were involved in the establishment and development of the Shankar Narayan Education Trust.