Maharashtra Darshan

'महाराष्ट्र दर्शन' कार्यक्रमात अष्टपैलू आचार्य अत्रे व शाहीर साबळे यांच्या कलांचा आविष्कार भाईंदर(पु). येथील शंकर नारायण महाविद्यालयाच्या मराठी भाषा व वाङ्मय मंडळातर्फे 'महाराष्ट्र दर्शन' हा कार्यक्रम प्रतिवर्षी आयोजित केला जातो. या साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमात यावर्षी आचार्य अत्रे यांचे अष्टपैलुत्व आणी शाहीर साबळे यांचे महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य विद्यार्थ्यांसमोर सादर करण्यात आले.

दि. २० ऑगस्ट २०१५ रोजी प्रविण पाटील सभागृहात महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एकच गर्दी केली होती. कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांनी आचार्य अत्रे यांचे नाटककार, कवी, चित्रपट निर्माता, पत्रकार अत्रे तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी महाराष्ट्र जनमत जागृत करणारे अत्रे अशा विविध रूपातील त्यांचे कार्य नृत्य, नाट्य, गायन रुपात सादर केले.

तर शाहीर साबळे यांच्या लोकगीताच्या आधारे गणेशवंदना, गण-गवळण-बतावणी, लोकनृत्य, भारुड व शिवाजी महाराजांवरील पोवाडा ही महाराष्ट्राची लोकसंस्कृती सादर केली.

शेवटी मुंबईतील मराठीचे आक्रसत जाणे संयुक्त महाराष्ट्र चळवलीच्या पार्श्वभूमीवर जोडून घेतले. या कार्यक्रमातून मराठी भाषेचा ठेवा जपला पाहिजे हा विचार रुजवला गेला. महाविद्यालयाचे संस्थापक श्री. रोहीदासजी पाटील, सचिव श्री. महेशजी म्हात्रे, नगरसेविका सौ. कल्पनाताई म्हात्रे तसेच प्राचार्य डॉ. विष्णू यादव यांच्या प्रेरणेतून प्रतिवर्षी या कार्यक्रमाची संकल्पना साकारली जाते. त्यांच्या बहुमोल मार्गदर्शनामुळेच हा कार्यक्रम यशस्वीपणे सर्वांसमोर ठेवणे वाङ्मय मंडळाला शक्य होते.